राखीव खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅच ! स्थानिक स्वराज्य संस्था उमेदवारी अंबादास दानवे यांच्या पारड्यात; रावसाहेबांच्या वजनाची प्रतीक्षा !

Foto

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप-सेनेची खलबते अजूनही सुरूच आहेत. काल शिवसेनेकडून ज्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती झाल्या त्यांची नावे मागे पडली आहेत. आता जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यात जमा असल्याचे समजते. मात्र सर्वाधिक मतदार जालन्याचे असल्याने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे वजन अंबादास दानवे यांच्या पारड्यात पडते का ? एवढाच काय तो प्रश्न आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे बहुमत आहे. त्यामुळे विजय निश्चित असल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बंड केल्यानंतर आमदार अर्जुन खोतकर यांनी विधान परिषद जागेचा शब्द घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खोतकर यांनी वचननामा घेतला.  लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय गणिते वेगाने बदलली. जनतेने भाजप सेनेला भरभरून मते दिली. त्यामुळे विधानसभेतही युतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत अर्जुन खोतकर यांनी पुन्हा विधानसभा लढवावी असा मतप्रवाह दोन्ही पक्षात आहे. दुसरीकडे शिवसेनेत उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली. आमदार अर्जुन खोतकर मनपा माजी सभापती राजू वैद्य, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेदी तसेच वैजापूर नगर परिषदेतील गटनेते प्रकाश चव्हाण यांच्या काल मातोश्रीवर मुलाखती झाल्या. मात्र ऐन वेळी अंबादास दानवे यांचे नाव समोर आले.

उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी टाकले वजन...
दरम्यान शिवसेनेचे थिंकटॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुभाष देसाई यांनी अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. गेल्या दोन दशकांपासून अंबादास दानवे शिवसेनेसाठी अहोरात्र झटत आहेत. जिल्ह्यात भाजपला रोखण्यासाठी दानवे यांसारख्या मराठा नेत्याला पाठबळ देणे गरजेचे असल्याची बाब देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या गळी उतरल्याचे बोलले जाते. विधानसभा निवडणुकीतही या मराठा कार्डचा सेनेला फायदा होईल असेही गणित देसाईंनी मांडले आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट शक्यता आहे. 

मराठा तितुका मिळवावा...
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात मराठा क्रांती मोर्चा ने मोठी सामाजिक चळवळ निर्माण केली आहे. विशेष म्हणजे नेहमीच निवडणुकीत सक्रिय असणारा हा समाज राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग आहे. लोकसभा निवडणुकीतही याचा प्रत्यय आला. भाजपने मराठा कार्डचा पुरेपूर वापर करून घेतला होता. सेनेलाही आता मराठा कार्ड हवेहवेसे वाटू लागले आहे. जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे नावाचे हक्काचे कार्ड भाजपच्या ताब्यात आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी सेनेला मराठा कार्ड म्हणून अंबादास दानवे यांचा लाभ होऊ शकतो असे सेनेच्या राजकीय पंडितांना वाटते.

आज होणार घोषणा ?
दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. जिल्ह्यातील झाडून सारे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. रात्री उशिरापर्यंत खोतकर की दानवे यावर खलबते सुरू होती. आज दुपारनंतर उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. आज घडीला तरी अंबादास दानवे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे शिवसेना नेते सांगत आहेत. अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker